सप्रेम नमस्कार,
आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ‘निवडून आल्यानंतर काहीच करीत नाहीत’ ही आपल्या सगळ्यांची समान तक्रार असते. परंतु लोकप्रतिनिधींनी काम करावे यासाठी आपण काय प्रयत्न करीत असतो, असा प्रश्न आपण स्वत:लाच कधी विचारला आहे का? आपल्या गल्लीत फरशा लावायला हव्यात, सार्वजनिक शौचालयांची नितांत आवश्यकता आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणवतात; परंतु त्या आपण लोकप्रतिनिधींपर्यंत संघटितपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करतो का? आपल्या मागण्यांना संघटित प्रयत्नांची साथ लाभली तर परिस्थितीत अनुकूल बदल कदाचित होऊ शकेल. अर्थात, यासाठी संघटित आणि जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कोणतेही चांगले काम करण्याची आपली इच्छा कृतीत येण्यात अडथळा येतो तो ‘मी एकटा काय करणार?’ या भावनेचा. परंतु मला जे वाटते तसे वाटणारे आपल्या आसपास अनेकजण आहेत, असे आपल्या ध्यानात आले तर?...
लवकरच महापालिकेची निवडणूक येते आहे. या निवडणुकीला आपल्या नागरी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. तेव्हा ही निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार आपल्यासाठी काय करू इच्छितात, किंबहुना त्यांनी काय करायला हवे, हे आपण सांगू शकलो तर?.... असेच काही करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करू शकू. आपण गोरेगावात राहणारे सगळेजण ‘गोरेगावकर नागरिक’तर्फे एकत्र येण्याचा, संघटित होण्याचा प्रयत्न करीत आहोत. संघटितशक्तीचा परिणाम काय असतो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, अशी कळकळीची व आग्रहाची विनंती! तरूण व महिलांनी या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
No comments:
Post a Comment