आमची भूमिका


माननीय बंधुवर गोरेगावकर नागरिक
सप्रेम नमस्कार

महापालिका निवडणूक आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका) निवडणुकीत एक गुणात्मक फरक असतो. लोकसभेत जाणार्‍या सदस्याने गाव, मोहल्ला असा संकुचित विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करावा, कायदे करावेत, त्यांची अंमलबजावणी नीट होते आहे यावर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा असते. ‘लोकसभेत जाऊन काय केले?’ असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो तेव्हा त्या सदस्याने आपल्या गल्लीत दिवाबत्तीची सोय केली नाही, बसस्टॉप बांधला नाही, पाण्याची पाइपलाइन आणली नाही आदी मुद्दे असतात. निरोगी लोकशाहीच्या दृष्टीने संसदसदस्याकडून अशा अपेक्षा करणे योग्य नव्हे.

असो. विधानसभेच्या (आणि त्याखालील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, उदा. महापालिका) निवडणुका मात्र स्थानिक प्रश्‍नावर लढविल्या जातात. प्रादेशिक (अ)समतोलाची पार्श्वभूमी या निवडणुकीला असते. उमेदवार बरेचदा आपल्या व्यक्तिगत परिचयाचा असतो आणि तोसुद्धा आपल्यापैकी अनेकांना व्यक्तिश: ओळखत असतो. आपल्या विभागातील, गल्लीतील, परिसरातील नागरी प्रश्‍नांची सोडवणूक करून घेण्याच्या दृष्टीने हा लोकप्रतिनिधी भरीव कामगिरी करू शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे आपण, त्याचे मतदार, त्याने असे करावे यासाठी त्याच्यावर अधिकृतपणे दबाव आणू शकतो.आगामी महापालिका निवडणूक ही या दृष्टीने आपल्यासाठी एक संधी आहे. राजकारणी मंडळींच्या नावाने खडे फोडणे, त्यांना सरसकट शिव्या देणे आणि त्यांची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, लाचखोरी, जातीयवाद आदी वैशिष्ट्यांचा उद्धार करणे सहजशक्य आहे. परंतु या मंडळींना ‘ते आपल्यासाठी आहेत. आपण त्यांच्यासाठी नव्हे!’ ही जाणीव करून देण्याची हिंमत आपण दाखवू शकतो का? काही ठिकाणी अशी हिंमत दाखविणे म्हणजे नसत्या डोकेदुखीला आमंत्रण देण्यासारखे असेलही. परंतु महाराष्ट्रात, मुंबईत आणि आपल्या गोरेगावात मात्र असे काही करण्याचा प्रयत्न आपण केला तर तो आपल्या अंगाशी निश्चितपणे येणार नाही. त्यातही संघटितपणे (संभाव्य) लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली तर त्याचा दीर्घकालीन फायदा आपल्या सगळ्यांनाच होईल. हाच उद्देश ठेवून ‘गोरेगावकर नागरिकां’तर्फे असा एक उपक्रम आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.

या संकल्पित कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा अशी आहे.या निवडणुकीला उभे राहणार्‍या सर्व उमेदवारांना जाहीर सभेत एका व्यासपीठावर आमंत्रित करावे. या उमेदवारांनी आपण निवडणुकीला का उभे राहू इच्छितो, निवडून आल्यास काय काय करू इच्छितो, ते करण्याची आपली कार्ययोजना (ऍक्शन प्लॅन) काय आहे आदी बाबी थोडक्यात मांडाव्यात. सर्व उमेदवारांनी आपापली भूमिका मांडल्यानंतर उपस्थित श्रोत्यांनी त्यांना आपल्या शंका/प्रश्‍न विचारावेत. प्रत्येक उमेदवाराने मांडलेली भूमिका आणि नंतरच्या प्रश्‍नोत्तरांमधून झालेली आणखी चर्चा या सगळ्याचे शब्दांकन करण्यात येईल. तसेच त्याचे व्हिडिओ चित्रणही करण्यात येईल. उमेदवारांनी आपल्याला कायकाय आश्वासने दिली आहेत आणि त्यासंदर्भात त्यांनी पुढील काळात काय केले आहे/काय करीत आहेत याचा थेट पुरावा यानिमित्ताने नागरिकांच्या हाती राहू शकेल.

हे झाले प्रत्यक्ष कार्यक्रमाबाबत. यानंतर या आश्वासनांचा पाठपुरावा नागरिकांनी करावा.दरवर्षी ही आश्वासने किती प्रमाणात पूर्ण झाली, याचे एक प्रगतीपुस्तक तयार करता येईल. गोरेगावमधील १००-१५० प्रतिष्ठित-तज्ज्ञ मंडळींनी यासाठी परीक्षक म्हणून काम करावे, असा प्रयत्न आहे. दर ठरावीक काळानंतर ही मंडळी एकत्र येतील आणि उमेदवारांच्या कामगिरीचा आढावा घेतील व वर्षअखेरीस आपला अहवाल (प्रगती पुस्तक) गोरेगावकरांना सादर करतील. असो.जाहीर सभेत, उमेदवाराने काही संभाव्य शक्यतांचा विचार करून त्यावरही आपली भूमिका मांडावी, असा आग्रह धरला जाईल. त्या शक्यता अशा - अ) मी निवडून आल्यावर अमुक करीन, तमुक करीन, अशी अनेक आश्वासने दिली जातात. परंतु या आश्वासनांना आधार काय? यापूर्वी त्या उमेदवाराने काय आणि किती सार्वजनिक काम केले आहे ज्याच्या आधारे तो निवडून आल्यावर भव्यदिव्य काही करून दाखविण्याचे आश्वासन देत आहे हे त्याने स्पष्ट करायचे आहे. त्याशिवाय आपण निवडून आलो नाही तर काय करू याबाबतही उमेदवाराने स्पष्टीकरण द्यायचे आहे. याबरोबरच जे उमेदवार पक्षातर्फे उभे राहात आहेत अशांबरोबर त्यांच्या पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि पक्षाची बाजू मांडावी, असा प्रयत्न आपण करू शकू. अपक्ष उमेदवारासाठी त्याच्या विश्वासातील कोणी हे काम करू शकतात.

गोरेगावासारख्या सुशिक्षित आणि सुजाण मतदारांची मोठी संख्या असलेल्या मतदारसंघात उभे राहणार्‍याने कोणतीही पळवाट न काढता, भविष्यातील शक्यतांचा विचार करून प्रामाणिकपणे आपली भूमिका आणि कार्ययोजना मांडावी, या अपेक्षेने कार्यक्रमाची मांडणी करण्यात येत आहे. जाहीर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नागरिकांनी या उमेदवार मंडळींना आपापले प्रश्‍न आणि शंका (अथवा सूचना) विचारायच्या आहेत. वानगीदाखल काही प्रश्‍न येथे देत आहोत. गोरेगावातील समस्या -उदा. वाढत्या घरफोड्या, महिलांच्या गळ्यातील साखळ्या पळविण्याचे वाढते प्रकार, स्टेशनजवळील गुरांच्या बाजाराची जागा, स्टेशनच्या दोन्ही बाजूंना बसलेला फेरीवाल्यांचा विळखा, पूर्वेला भाजीबाजाराची आवश्यकता, स्टेशनजवळच्या सब-वेची दयनीय अवस्था, आणखी किमान दोन गोरेगाव लोकल सुरू करणे, सायंकाळी चर्चगेट/दादरहून किमान दोन गोरेगाव लोकल सुरू करणे, आरे रस्त्यावरील वाहतूक कोंडी, वीटभट्टी, हनुमान टेकडी, सहकार वाडी, कामा इस्टेट आदी वस्त्यांमधील पाणीपुरवठा, साफसफाई, सार्वजनिक शौचालये, फरशा बसविणे... इ. मुंबईशी संबंधित समस्या - लोकल आणि बेस्ट प्रवास सुखकर, आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, अधिकाधिक भर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर असावा, पुनर्रचित इमारतींना जास्त एफएसआय मिळावा. इ.
हे मुद्दे कार्यक्रमाआधी उमेदवार तसेच त्यांच्या पक्षांपुढेही ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ते आपली भूमिका मांडताना या समस्यांचा विचार करतीलच, 3अपेक्षा आहे. पण या मुद्यांवर अनेक उपप्रश्‍न असू शकतात आणि याव्यतिरिक्तही अनेक प्रश्‍न असू शकतात. आपण सर्व सुजाण मंडळींनी असे प्रश्‍न मनात तयार करून ठेवावेत.

हा कार्यक्रम थोडा मोठा आहे. त्यासाठी बरीच तयारी करावी लागणार आहे. हा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाच्या दीर्घकालीन फायद्याचा आहे. हा कार्यक्रम आपल्यापैकी प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने त्यात मदत/सहभाग उचलावा, ही नम्र विनंती.

No comments:

Post a Comment